विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

भुसावळ – शहरात चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक हैराण असतानाच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव बाजारपेठ पोलिसांनी उधळून लावला आहे. वांगोळा रोडवरील म्हाडा कॉलनीतील स्वामी विहारच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी रात्री टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन संशयितांना अटक करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना काही संशयित दरोड्याच्या उद्देशाने एकत्र जमल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह पंचांसमक्ष स्वामी विहार परिसरातील कमानीजवळ सापळा रचला. त्यावेळी दोन दुचाकींवर सहा संशयित संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला, तर तिघांना जागीच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

रोहनसिंग सतनामसिंग चाचरा, वय 24

आर्यन सुनील मोरे, वय 22 (दोघे रा. भिरूड हॉस्पिटल मार्ग, भुसावळ)

विशाल सुपडू ठाकरे, वय 20, रा. कन्हाळा बुद्रुक, ता. भुसावळ . यांना अटक करण्यात आली आहे

पोलिसांनी आरोपींकडून 25 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2 हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, लोखंडी चाकू, स्टीलची फोल्डिंग स्टिक, मिरची पावडरची पुडी आणि 30 फूट लांबीचा दोरखंड जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या MH 19 DF 1879 आणि MH 19 EM 0918 क्रमांकाच्या दोन दुचाकी (अंदाजे 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या) देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

फरार झालेल्या तिघा संशयितांचा शोध बाजारपेठ पोलीस घेत असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!