जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
खानदेशच्या मातीतील गोडवा जपणाऱ्या खानदेशी बोलीभाषेला आता विद्यापीठाच्या पातळीवर अधिकृत व्यासपीठ मिळणार आहे. खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचा वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे स्वतंत्र बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांनी केली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले मंत्री उदय सामंत?
“खानदेशी ही केवळ बोली नाही, तर ती आमची संस्कृती आहे. तिचे दस्तऐवजीकरण होणे काळाची गरज आहे. मराठी भाषा विभागामार्फत या केंद्रासाठी लागणारा संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल,” अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.
यावेळी त्यांनी आणखी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या –
१. खानदेशी साहित्य संमेलन: लवकरच भव्य खानदेशी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. बोलीभाषा शब्दसंग्रह प्रकल्प: महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचा सर्वसमावेशक शब्दसंग्रह तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासन हाती घेणार आहे.
मराठी भाषेतील संशोधनाला प्रोत्साहन देणे, लोप पावत चाललेल्या बोलींचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य संमेलनांचे आयोजन यावर त्यांनी विशेष भर दिला.
यासोबतच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देत, शैक्षणिक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शासन ठाम भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे अहिराणी, खानदेशी, तावडी, भिली यांसारख्या बोलींना नवी ओळख मिळणार असून, उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक आणि अभ्यासक वर्गातून स्वागत होत आहे.
