मुंबई: राज्य सरकारकडे तब्बल 86,000 कोटी रुपयांची बिले थकल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी अखेर रणशिंग फुंकले आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.
महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, नगरविकास यासह विविध विभागांची मिळून सुमारे 86 हजार कोटींची बिले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. काम करूनही पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांवर बँकेचे व्याज भरण्याचीही वेळ आली आहे.
या थकबाकीमुळे आतापर्यंत 7 कंत्राटदारांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा गंभीर आरोप महासंघाने केला आहे. नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांच्या आत्महत्येनंतर हा असंतोष अधिकच तीव्र झाला आहे.
राज ठाकरेंकडे धाव, फडणवीसांना भेटीची मागणी
थकबाकीवरून आता राजकारणही तापले आहे. मराठी कंत्राटदारांची बिले थकवून गुजराती कंत्राटदारांना पैसे दिले जात असल्याचा आरोप करत कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
दुसरीकडे, महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या बैठकीची मागणी केली असून, थकबाकीमागील कारणांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
मागण्या काय?
1. 86 हजार कोटींची संपूर्ण थकबाकी तात्काळ वितरित करावी.
2. बिलांमध्ये केवळ 1% निधी वितरित होत असल्याचा प्रकार थांबवावा.
3. कंत्राटदारांच्या होणाऱ्या कथित छळाची चौकशी करावी.
19 ऑक्टोबरपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे नेते मंगेश आवळे यांनी दिला आहे.
