विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
धरणगाव (जळगाव) : शेतकऱ्याचा खरा सोबती, कुटुंबातील सदस्य असलेल्या सर्जाराजाच्या जाण्याने बांभोरी गावावर शोककळा पसरली आहे. ज्या बैलाला रंगरंगोटी करून, फुलांच्या माळा घालून गावात मिरवायचे होते, त्याच बैलाने ऐन पोळ्याच्या दिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील शेतकरी बारकू राजधर विसावे यांनी पोळा सणानिमित्त आपल्या बैलजोडीला मोठ्या प्रेमाने सजवले होते. वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवांचे आभार मानण्याचा हा दिवस. पारंपरिक उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढली जात होती. सर्वांच्या नजरा या सजलेल्या बैलजोडीवर होत्या.
मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. मिरवणुकीदरम्यानच अचानक एक बैल जागीच कोसळला. या अनपेक्षित घटनेने उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव सूर्यवंशी आणि डॉ. एस. बी. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बैलाची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या बैलामधील अतूट, जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. ज्या दिवशी आपल्या सर्जा-राजाचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करायची, त्याच दिवशी त्याची साथ सुटल्याने विसावे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण पडले असून, ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे बांभोरीसह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
