सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; ‘आरक्षण अबाधित ठेवा’च्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन — परिवर्तन चौकात पथनाट्य सादर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

दि. ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सकल बौद्ध समाजाच्या वतीने शुक्रवारी (४ सप्टेंबर) शहरात हजारोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरुष, युवक-युवती तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरातील वातावरण निळे झाले होते. ‘आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड रोड येथून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. बोदवड चौफुली, बसस्थानक मार्गे मोर्चा परिवर्तन चौकात पोहोचला. सहभागी समाजबांधवांनी पांढरे वस्त्र परिधान करून गळ्यात निळे रुमाल आणि हातात निळे ध्वज घेतले होते. त्यामुळे संपूर्ण मोर्चा निळ्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत होते.

परिवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत समाजबांधवांनी त्रिसरण व पंचशील ग्रहण केले.

सुनील पवार यांचे सविस्तर मार्गदर्शन….

मोर्चानंतर परिवर्तन चौकात झालेल्या सभेत मालेगाव येथून आलेले प्रमुख वक्ते सुनील पवार यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातींमधील विविध घटकांच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्कांवर संभाव्य परिणाम, सामाजिक व शैक्षणिक परिणाम तसेच या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज याबाबत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पवार यांच्या मार्गदर्शनानंतर युवक-युवतींनी पथनाट्याच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले. पथनाट्याला उपस्थित समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्र्यांना तहसीलदारां मार्फत निवेदन……

मोर्चाच्या वतीने तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ उपस्थित होते. हे निवेदन तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रस्तावित प्रक्रिया तात्काळ स्थगित करून रद्द करावी, उपवर्गीकरणाचा विविध घटकांवर होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय परिणामांचा सखोल अभ्यास करावा आणि अनुसूचित जातींच्या संविधानिक आरक्षणाच्या हक्काला बाधा येईल, अशी कोणतीही कार्यवाही करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

यासोबतच अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करावी, नवीन विकासात्मक योजना सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, युवक, महिला, उद्योजक व बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या विशेष योजना राबवाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज, निवास व आरोग्यासह मूलभूत सुविधांचा प्राधान्याने विकास करावा, रमाई आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा, तसेच सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी इतरत्र वळवू नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

चोख पोलीस बंदोबस्त; वाहतूकही सुरळीत……

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली नाही. त्यामुळे मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!