विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.
जळगाव : शहरातील पिंपळा परिसरात एका घरातून सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर रामानंद नगर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. मानवी तस्करीविरोधी पथक आणि रामानंद नगर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून संबंधित घरावर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच तीन ग्राहक आणि एका पंटरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काही काळापासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मानवी तस्करीविरोधी पथकाला मिळाली होती.
या प्रकरणात दोन महिलांसह एकूण तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अचानक झालेल्या कारवाईमुळे जळगाव शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रकरणाचा अधिक तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.
