अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने.

भाजप प्रवेश, विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर विखे फॅक्टरचा केलेला उल्लेख… आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. राहुरीतील विजयी रॅली आणि आभार सभेत बोलताना तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर राहुरी शहरात आमदार प्राजक्त तनपुरे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भव्य विजयी रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर झालेल्या आभार सभेत तनपुरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भाजप प्रवेशापासून विधान परिषदेपर्यंतच्या वाटचालीत विखे पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. अवघ्या चार दिवसांत भाजप प्रवेश आणि आमदारकी मिळाल्याने विखे फॅक्टरची ताकद जवळून अनुभवायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाची आणि सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली. – प्राजक्त तनपुरे, आमदार

भाजप प्रवेशानंतर अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर निवड होण्यामागे पक्ष नेतृत्वासह राधाकृष्ण विखे पाटील यांचेही मोठे योगदान असल्याचे तनपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्राजक्त तनपुरे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या विश्वासाचा उल्लेख केला. विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारची संपूर्ण ताकद तनपुरे यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. – राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

विखे पाटील यांच्या या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. राहुरीतील ही विजयी सभा आणि विखे-तनपुरे यांची वाढती राजकीय जवळीक आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!