मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे.
मराठवाडा: राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून, हवामान विभागाने २९ मार्चपासून ते १२ मे पर्यंतचा प्रदीर्घ ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या काळात मराठवाड्यातील तापमानात मोठी वाढ होण्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाढत्या उन्हाचा आणि अवकाळीचा दुहेरी धोका हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या ५० दिवसांच्या प्रदीर्घ काळात मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच वेळी वातावरणात निर्माण होणाऱ्या बदलांमुळे अचानक विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
शेतमाल सुरक्षित ठेवा: काढणीला आलेली पिके पावसापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी साठवावीत.
आरोग्याची काळजी घ्या: उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पाण्याचे भरपूर सेवन करावे.
विजेपासून बचाव : विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे.
हवामानातील या बदलांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
