जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी – शहरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) वाहतूक सिग्नल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव शहरात सध्या तापमानात मोठी वाढ झाली असून, विशेषतः दुचाकी चालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील चौकांमध्ये सिग्नलमुळे वाहनचालकांना बराच वेळ उन्हात थांबावे लागत असल्याने चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.
मनसेने या पार्श्वभूमीवर सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रमुख सिग्नल बंद ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करून पर्यायी व्यवस्था करण्याचेही सुचवले आहे.

दरम्यान, या निवेदनाची दखल घेत वाहतूक पोलिस निरीक्षकांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्षॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, आशुतोष जाधव, चेतन पवार, संदीप मांडोळे. खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, जितेंद्र पाटील, साजन पाटील, युसुफ खाटीक, बादशाह शहा, राजेश मराठे, यांच्या यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
