मराठवाडा प्रतिनिधी :- अनिरुद्ध साबळे, जालना.

जालना : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचे तीव्र पडसाद जालना जिल्ह्यात उमटले असून, शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत बागेश्वर बाबांवर कडक कारवाई करण्याची आणि त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

नेमका काय आहे वाद?

नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाष्य केले होते. “शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकुट व राज्य समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले,” असे विधान त्यांनी केले. या विधानामुळे इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे. महाराजांनी कधीही हार मानली नाही किंवा ते थकले नाहीत, असा स्वाभिमानी इतिहास असताना बाबांनी केलेले विधान हे जाणीवपूर्वक अपमान करणारे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

जालन्यात शिवप्रेमींचा आक्रोश

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जालन्यातील मुख्य चौकात शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी बागेश्वर बाबांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निषेध आंदोलन : आंदोलकांनी बाबांच्या फोटोला जोडे मारले आणि त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांत धाव : विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही, तर विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!