Milind Kadam M4B

मुंबई : नागरिकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच या समाधान शिबिराकडे ‘जनता दरबार’ म्हणून पाहत प्रत्येक नागरिकाच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिकेचे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्राप्त होणारे अर्ज व निवेदने वेळेत निकाली काढण्याचे निर्देश दिले. शासनाने प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा दिली असून कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या शिबिरात विद्यार्थी, महिला, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांसाठी अर्ज भरून घेण्यात आले व त्याची तत्काळ पूर्तता करून दाखले वितरित करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. याशिवाय नवीन आधार नोंदणी व आधार अद्ययावत करण्यासाठी विशेष स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी अभियानाची माहिती देत जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील सामान्य प्रशासन विभागातील उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, तहसीलदार संदीप आवारी, राजेश वैष्णव, संकेत यमगर तसेच महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालक आणि इतर संबंधित विभागांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर (टप्पा-१) अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींची जनजागृती करणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढविणे तसेच सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने मार्च ते मे या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!