जळगाव प्रतिनिधी : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत जिल्ह्यासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध राहील याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याला मागणीपेक्षा अधिक खत पुरवठ्याचा कोटा मंजूर झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. त्यांनी जिल्ह्यातील खत पुरवठ्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती सादर केली.

यावेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच खतांची अनावश्यक साठवणूक न करण्याचे आवाहन केले. जमिनीची आरोग्यपत्रिका आणि पिकांच्या गरजेनुसारच खत खरेदी करावे, असेही सांगण्यात आले.

खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विक्रेत्यांना आधार लिंकिंग (e-POS) प्रणालीद्वारे खत विक्री आणि अचूक बिलिंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच खरीप हंगामात खतांचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कृषी विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे विभाग, वाहतूकदार तसेच शेतकरी संघटनांनी समन्वयाने काम करावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

खरीप हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वितरण प्रक्रियेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार असून पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त निविष्ठा वाटपाला प्राधान्य दिले जाणार आहे, असे यावेळी जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!