भोकरच्या SBI बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; व्यवस्थापकाला बांधून लाखोंचा ऐवज लुटला, ग्रामस्थांनी एका दरोडेखोराला पकडले
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
जळगाव तालुक्यातील भोकर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत शनिवारी दुपारी भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने दुचाकीवरून येत कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम आणि सोने लुटून नेले. या घटनेने भोकरसह संपूर्ण जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुपारच्या वेळी बँकेत ग्राहकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला. बँकेत घुसताच त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना दहशतीखाली घेतले.
दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला बेदम मारहाण करून खुर्चीला बांधून ठेवले. इतर कर्मचाऱ्यांनाही बंदुकीचा धाक दाखवून एका कोपऱ्यात उभे केले आणि काही मिनिटांतच बँकेतील रोकड आणि सोने बॅगांमध्ये भरून दुचाकींवरून पसार झाले.
डिकसाईच्या ग्रामस्थांची धाडसी कामगिरी
दरोडा टाकून आरोपी जळगावच्या दिशेने पळून जात असताना डिकसाई गावाजवळ त्यांच्या हालचाली ग्रामस्थांना संशयास्पद वाटल्या. ग्रामस्थांनी धाडस दाखवत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याच्याकडील बॅग देखील हस्तगत करण्यात आली आहे. तर अन्य ठिकाणी आणखी दोन संशयितांना पकडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेतली जात आहे. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, बँकेतून नेमकी किती रोकड आणि किती सोने लुटण्यात आले याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
