कुंभमेळा विशेष वृत्तांत
नाशिक प्रतिनिधी, दि. ३१ ऑक्टोबर २०२६:
आज नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पावन पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या ऐतिहासिक सोहळ्याचे ‘ध्वजस्तंभ पूजन’, ‘ध्वज पूजन’ आणि ‘ध्वजारोहण’ महामहिम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

राष्ट्रपतींच्या गरिमामय उपस्थितीने या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याची शोभा द्विगुणित झाली. गोदावरीच्या तीरावर भगवा ध्वज फडकताच हर हर महादेव आणि जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भारताच्या समृद्ध सनातन सांस्कृतिक परंपरेचा हा एक अत्यंत गौरवशाली आणि अभिमानास्पद क्षण ठरला.

याप्रसंगी व्यासपीठावर महामहिम राज्यपाल जिष्णू देव वर्मा जी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह १३ आखाड्यांचे महामंडलेश्वर, अनेक आध्यात्मिक साधू-संत, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपतींनी साधू-संतांचे आशीर्वाद घेतले आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहणाने आता अधिकृतपणे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीचा शंखनाद झाला आहे.
