संपूर्ण जिल्ह्यात मानधन वाटप, फक्त घनसावंगीतच खोळंबा
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
घनसावंगी तालुक्यातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) वर तहसील प्रशासनाकडून उघड अन्याय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्षभर मतदार याद्या अद्ययावत ठेवणे, एसआयआरचे जोखमीचे काम आणि निवडणूक काळात अहोरात्र जबाबदारी पार पाडणाऱ्या बीएलओंचे हक्काचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हे मानधन वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर होऊन घनसावंगी तहसील कार्यालयात जमा होऊनही, केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे ते बीएलओंच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले नाही.
जालना जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांतील बीएलओंचे मानधन महिनाभरापूर्वीच त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. मात्र एकट्या घनसावंगी तालुक्यातच हा निधी तहसील कार्यालयात पडून आहे. निधी उपलब्ध असतानाही मानधन का दिले जात नाही? असा संतप्त सवाल बीएलओ कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सततच्या कामाच्या ताणात असणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काच्या मानधनासाठीच वणवण करावी लागत असेल तर हे दुर्दैवी आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
संपूर्ण जिल्ह्यात मानधन जमा झाले असताना, घनसावंगी तहसील कार्यालयाकडून मागील तीन महिन्यांपासून निधी उपलब्ध असूनही मानधन जमा केले जात नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बीएलओंचे मानधन खात्यावर वर्ग करावे; अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
– सचिन डोके, तालुकाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, घनसावंगी.
तहसील प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून बीएलओंचे तीन महिन्यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करावे, अशी जोरदार मागणी आता तालुकाभरातून होत आहे.
