पदभार घेताच PI अभिषेक पाटील यांचा ॲक्शन मोड ऑन!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जैस्वाल

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुणाखांब गावात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी मोदरापाडा परिसरातील एका शेतात छापा टाकला. या शेतात बाजरीच्या पिकाच्या आड बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करण्यात आली होती. पथकाने पंचांसमक्ष पाहणी करून सुमारे 28 लाख 58 हजार 300 रुपये किंमतीची 58 किलो 246 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई

सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हुणाखांब शिवारातील मोदरापाडा येथे बाजरीआड गांजा शेती फुलवण्यात आली आहे. माहिती मिळताच पाटील यांनी तात्काळ पथकासह शेतावर धाड टाकून मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी संशयित आरोपी सोत्या काल्या तडवी (वय 60, रा. मोदरापाडा, हुणाखांब, पो. पिंपळखुटा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) याच्या विरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तडवी, जितेंद्र पाडवी, अंमलदार अनिल नागरगोजे, अभय राजपूत, हेमंत बारी, विनोद पाटील, रवींद्र अहिरे आदींच्या पथकाने सहभाग घेतला.

नूतन निरीक्षक पाटील यांनी येताच केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!