जळगाव – जळगाव शहरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून एका तरुणावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील विवेकानंद नगर परिसरात रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी तरुणाचे नाव अर्जुन रोहिदास राठोड, वय २८ वर्षे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या उजव्या कानाखाली गोळी लागली असून त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
अर्जुन राठोड याचा काही जणांशी प्रॉपर्टीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. काल रात्री रिदम हॉस्पिटल जवळ त्यांच्यात बाचाबाची झाली. वादानंतर अर्जुन हा गाडीवर बसत असताना मागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडून पळ काढला. एका गाडीवर तीन ते चार जण होते, अशी माहिती जखमीने स्वतः दिली आहे.
रुग्णालयात दिलेल्या जबाबात अर्जुन राठोड याने आरोप केला आहे की, “संदीप जैन यांनी पैसे देऊन माझ्यावर फायरिंग करायला लावली आहे.”
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद शेवाळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, जखमीच्या दुचाकीवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते आणि या मागे नेमके कारण काय आहे, याचा तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
