विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित.

पहूर, ता. जामनेर : तालुक्यातील पहूर येथून अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. घरात एकटी असताना १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. मीनल सुनील पाटील असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मीनलचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. ती घरात एकटीच होती. यावेळी तिची आजी घरी परतली असता, बराच वेळ दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. संशय आल्याने तिने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता मीनल गंभीर अवस्थेत आढळून आली.

कुटुंबीयांनी तिला तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. रुग्णालयात शवविच्छेदनाची सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून, मंगळवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मीनल ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता, त्यामुळे शाळेच्या वतीने तिला ध्वजारोहणाचा मानही देण्यात आला होता. सध्या ती जामनेर येथील धारिवाल महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होती. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनण्याची तिची जिद्द होती.

मात्र नियतीने घाला घातल्याने तिचे स्वप्न अधुरे राहिले. तिच्या अकाली जाण्याने पहूर परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.

या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेश पाटील आणि अमोल पाटील अधिक तपास करीत आहेत.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!