विभागीय प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित )

अडावद : -चोपडा तालुक्यातील अडावद येथे अनिश्चित पाऊस, शेतीतील अनिश्चितता आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा गंभीर यांच्याकडे सुमारे पाच एकर कोरडवाहू शेती होती. मागील वर्षी मक्याच्या पिकातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. यावर्षी चांगले उत्पादन मिळेल या आशेने त्यांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली.

घेतलेले कर्ज कसे फेडायचे, शेतीचे नुकसान कसे भरून काढायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेतून ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अखेर १४ जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली.

घटनेनंतर त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ जून रोजी शवविच्छेदनानंतर अडावद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, हवामानातील अनिश्चितता आणि कर्जबाजारीपणाच्या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!