जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार.
यावल किनगांव पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन वर्षे उलटली, तरीही किनगाव येथील ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू न झाल्याने आज ग्रामस्थांचा रोष रस्त्यावर पाहायला मिळाला. ‘श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती’च्या वतीने आज श्रीराम मंदिर चौक ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान एक भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात गावातील अबालवृद्ध, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सन २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे झाली तरी येथे ना वैद्यकीय यंत्रसामग्री आहे, ना पुरेसा कर्मचारी वर्ग, ना रुग्णवाहिका! रुग्णालयाच्या या दुरवस्थेमुळे स्थानिक रुग्णांना बैलगाडी किंवा ट्रॅक्टरमधून उपचारार्थ आणावे लागते. येथे सुविधांअभावी वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना २५ किलोमीटर दूर जळगावला न्यावे लागते. दुर्दैवाने, अनेक रुग्ण वाटेतच जीव गमवत असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला.

मोर्च्यादरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भीषण परिस्थितीचा जिवंत देखावाच सादर केला. या गंभीर समस्येवर चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे देखील शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. आंदोलनाची दखल घेत जळगावहून आलेले डॉ. मनोज पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली व “येत्या एक महिन्यात सर्व सुविधांसह रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल,” असे लेखी आश्वासन दिले.

यावेळी शिवस्मारक कृती समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. दिलेल्या मुदतीत रुग्णालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे .
