जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

जामनेर तालुक्यातील मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना आईने आपल्या प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रियकराने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो स्टेटसला ठेवल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या मुलीचा येत्या गुरुवारी साखरपुडा होणार आहे. साखरपुड्याच्या तयारीसाठी संपूर्ण कुटुंब व्यस्त असतानाच दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला अचानक घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, महिलेच्या प्रियकराने आपल्या मोबाइलवरील व्हॉट्सअॅप स्टेटसवर दोघांनी विवाह केल्याचे फोटो अपलोड केले. हे फोटो नातेवाईक आणि परिचितांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती कुटुंबीयांना दिली. लग्नाचे फोटो पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या घटनेमुळे मुलीच्या साखरपुड्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कुटुंबीयांवर सामाजिक दबाव वाढला आहे. विशेषतः मुलीच्या वडिलांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून समाजात बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हतबल झालेल्या पतीने थेट जामनेर पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे मदतीची याचना केली. “अवघ्या पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील लग्नाचे स्टेटस पाहून समाजात आमची नाचक्की होत आहे. कृपया ते स्टेटस हटविण्यास सांगा,” अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!