जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.
वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वाईट संगतीमुळे मद्य, गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका बालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचार आणि समुपदेशनामुळे नवजीवन मिळाले आहे. या यशस्वी उपचारांमुळे बालकाची प्रकृती सुधारत असून त्याचे लक्ष पुन्हा शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळू लागले आहे.
जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारा हा विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना काही मित्रांच्या संगतीत आला. या संगतीचा परिणाम म्हणून त्याने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागली. व्यसनामुळे त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढला, भूक कमी झाली आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागले. मुलाच्या बदललेल्या वर्तनामुळे पालक चिंतेत पडले.

पालकांनी तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. येथे मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्याची सखोल तपासणी केली. आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसह औषधोपचार सुरू करण्यात आले. याचबरोबर नियमित समुपदेशनाद्वारे बालकाच्या मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
उपचारादरम्यान त्याला विविध सर्जनशील आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी केलेले उपचार, समुपदेशन आणि कुटुंबाचे सहकार्य यामुळे बालकाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्याच्या आयुष्यात नव्या आशेची पहाट उगवली आहे.
