पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधवांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ‘माँ सेवाभावी संस्थे’चा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
खुर्चीवर बसून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. जालना तालुका पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या मुजोर आणि मनमानी कारभारामुळे गोरगरीब जनता त्रस्त झाली असून, त्यांची तात्काळ चौकशी करून बदली करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘माँ सेवाभावी बहुउद्देशीय संस्थे’ने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत या भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचला आहे. जालना पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश जाधव हे नागरिकांशी अत्यंत उद्धटपणे वागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रारदारांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांना हुसकावून लावणे आणि कामात टाळाटाळ करणे हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे. रेशन कार्डाच्या ऑनलाईन प्रिंटवर सहीचे अधिकार जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवून, जाधवांनी नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावले आहेत.

रेशनमध्ये ‘डल्ला’: दुकानदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे?
जाधवांच्या आशीर्वादाने रेशन दुकानदार गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
इझक्क कार्डधारकः ५ व्यक्तींमागे २५ किलो धान्य मिळणे अपेक्षित असताना, केवळ १५ ते २० किलोच दिले जात आहे. (५ ते १० किलोची थेट चोरी!)
अंत्योदय योजनाः विधवा, अंध, अपंग आणि गरजू महिलांना मिळणाऱ्या ३५ किलो धान्याऐवजी केवळ २५-३० किलो धान्य देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. वेळेचे उल्लंघनः रेशन दुकाने वेळेवर उघडली जात नाहीत, मात्र यावर कारवाई करण्याऐवजी जाधव रेशन दुकानदारांना पाठीशी घालत आहेत.
प्रकाश जाधव हे स्वतः कार्यालयात थांबत नाहीत आणि आलेल्या नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देतात. रेशन दुकानदार आणि या अधिकाऱ्याचे साटेलोटे असल्याशिवाय गरिबांच्या धान्यावर डल्ला मारला जाऊ शकत नाही. अशा उद्धट अधिकाऱ्याची त्वरित बदली होणे गरजेचे आहे. – बाबासाहेब वानखेडे (अध्यक्ष, माँ सेवाभावी बहुउद्देशीय संस्था) मंत्रालयापर्यंत पोहोचली तक्रार !
हे प्रकरण केवळ जिल्हा स्तरावर मर्यादित न ठेवता, बाबासाहेब वानखेडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांच्याकडेही तक्रार नोंदवली आहे. माजी सुरक्षा दलातील व्यक्ती असूनही लोकशाहीत नागरिकांशी अमानवीय आणि उद्धट वर्तन करणाऱ्या प्रकाश जाधव यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना जालन्यातून हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण जालन्याचे लक्ष लागले आहे !
