जळगाव :- ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि गावागावात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ करणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढवणे आणि गाव पातळीवर आरोग्यदायी जीवनशैली विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे राज्यव्यापी अभियान १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे.

हे अभियान केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न राबवता लोकसहभागातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. गावापासून ते राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवा आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत आवश्यक वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.

या अभियानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि त्यांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे यावर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण आहार आणि स्वच्छ परिसर यांसारख्या मूलभूत बाबींच्या माध्यमातून आजार होण्यापूर्वीच त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यासोबतच संसर्गजन्य आजारांबरोबरच बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांनाही या मोहिमेत प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणांपर्यंत सर्व घटक या अभियानात सक्रियपणे सहभागी होणार असून गावागावात स्वच्छता, आरोग्य आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘आरोग्यसंपन्न गाव’ किताबाने सन्मान

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समिती संपूर्ण अभियानावर देखरेख ठेवणार असून आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखालील कृती समिती कामाचे नियोजन करणार आहे. गाव पातळीवर आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न ग्राम हा किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे.

कोट्यवधी रुपयांचे पुरस्कार

या संपूर्ण अभियानासाठी राज्य शासनाने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव आणि आरोग्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

राज्य स्तरावर पहिला क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी ३ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत. पंचायत समिती स्तरावरही पहिल्या क्रमांकासाठी २ कोटी रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी १.५ कोटी रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १.२५ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

तसेच राज्य स्तरावर सर्वोत्तम ठरणाऱ्या ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांना ७५ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. उपआरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर ५ लाख आणि राज्य स्तरावर २५ लाख रुपये, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा स्तरावर १० लाख आणि राज्य स्तरावर ५० लाख रुपये पुरस्कार मिळणार आहेत. गावांच्या बाबतीतही आकर्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा स्तरावर २५ लाख, विभागीय स्तरावर १ कोटी आणि राज्य स्तरावर ५ कोटी रुपये इतका पुरस्कार देण्यात येणार आहे.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी उभारी

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणार असून ते दरवर्षी नियमितपणे आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला दरवर्षी आपली आरोग्यविषयक कामगिरी सुधारण्याची आणि पुरस्कार मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

एकूणच, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि स्वच्छ, निरोगी व सुदृढ गावांची निर्मिती करणे या दृष्टीने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!