मराठवाडा विभागीय प्रतिनिधी:- अनिरुद्ध साबळे
वडीरामसगाव (जालना): तालुक्यातील वडीरामसगाव येथे हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या सात दिवसांपासून गावात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. दररोज पहाटे काकडा भजन, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने पार पडली. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे हनुमंताचा जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर सकाळी काल्याचे कीर्तन झाले.

भक्तीमय वातावरण आणि महाप्रसाद
काल्याच्या कीर्तनानंतर ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वडीरामसगावसह परिसरातील भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. ‘बजरंग बली की जय’ च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीभावामुळे हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
