
अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाणे.
राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला.

शोकसंदेशपर भाषणात सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व” होते. त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता.

यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भाषण केले.
