जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. विशेष वृत्तांत

घनसावंगी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये विस्कळितपणा निर्माण झाला आहे. यामुळे घनसावंगी तालुक्यातील काही पंप बंद असल्याचे चित्र आहे. पंप बंद असल्याच्या फलकांमुळे वाहनधारकांना इंधनासाठी वणवण करावी लागत असून, मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी नम्रता साठे यांनी याप्रकरणी सर्व तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

इंधन कंपन्यांकडून होणारा पुरवठा संथगतीने होत असल्याने अनेक पंपांवरील साठा संपला आहे. विशेषतः ग्रामीण भागात डिझेलचा तुटवडा अधिक जाणवत असून, याचा थेट परिणाम शेतीकामे आणि मालवाहतुकीवर होत आहे. काही ठिकाणी साधे पेट्रोल उपलब्ध नसल्याने ग्राहकांना आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे. ऐन कामाच्या वेळी पेट्रोल पंप बंद असल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवासी यांचे मोठे हाल होत आहेत. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी वादविवादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. कंपन्यांकडून मागणीनुसार पुरवठा न झाल्यामुळे ही तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून, येत्या एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर साठा उपलब्ध नसल्याने तात्पुरते बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. परिणामी, नागरिक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल वाहनांमध्ये भरत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे. पेट्रोल पंपांवर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आवश्यकता असल्यास पोलिस प्रशासनाच्या मदतीने योग्य नियोजन करावे. स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे अधिकृत व सत्य माहिती प्रसारित करावी, कोणत्याही प्रकारची साठेबाजी, गैरवापर किंवा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर बाब अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण वैयक्तिक लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी व कोणतीही अफवा पसरू नये, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. आपल्या स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तसेच दररोज बंद/चालू पेट्रोलपंपाबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असा आदेश तहसीलदार जिल्हा पुरवठा अधिकारी नम्रता चाटे यांनी सर्व तहसीलदार यांना काढला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!