जळगाव जिल्हा प्रतिनिधी /रावेर:
रावेर येथील आरोग्य प्रशासनात सध्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला असून, डॉ. सचिन भाईकर आणि त्यांचे सहकारी पंकज शिंपी यानी संगनमताने मोठा ‘संगणक घोटाळा’ केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, गरीब आणि गरजू उमेदवारांकडून लाखो रुपये उकळून नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे.

वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म!
मिळालेल्या माहितीनुसार, वसीम शेख यांनी या घोटाळ्याबाबत जिल्हाधिकारी, आरोग्य मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे पुराव्यासह अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. मात्र, महिना उलटूनही या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले असून, ते उजळ माथ्याने फिरत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमका घोटाळा?
१. संगणक महाघोटाळा: आरोग्य विभागात संगणक खरेदी करण्यात आले अव्वाच्या सव्वा किमती लावून या खरेदी करण्यात आल्या या खरेदी एक कोटी रुपयांच्या आसपास असून या खरेदीमध्ये माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंकज शिंपी यांना नोटिसा बजावल्या होत्या परंतु त्यांची बदली झाल्याचा फायदा घेत सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अंधारात ठेवून सदरचे बिल काढण्यात आले वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर करण्यात आला.
२. अवैध नोकरभरती: पात्र बेरोजगारांना डावलून, पैशांच्या जोरावर अनेक लोकांना नियमबाह्य पद्धतीने/ नियमांची पायमल्ली करत सेवेत सामावून घेण्यात आले. यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांचा आक्रमक पवित्रा:
“मी लोकशाही मार्गाने सर्व वरिष्ठ कार्यालयांत तक्रारी दिल्या आहेत. जर सरकारी यंत्रणा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असेल, तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? जर येत्या काही दिवसांत या दोघांना निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे,” असा इशारा वसीम शेख यांनी दिला आहे.
