जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
जामनेर शहरासह तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. सट्टा-जुगार, अवैध दारू विक्री तसेच अमली पदार्थ गांजाची खुलेआम विक्री होत असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
” विशेष म्हणजे, हे अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार म्हणजेच ‘हप्ते’ दिले जात असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे.” काही ठिकाणी तर मुख्य रस्त्यांवरच बिनधास्तपणे हे प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकारांकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत असून, अपेक्षित ती ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नुकतेच पदभार स्वीकारलेल्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या अवैध धंद्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत आहे.
जामनेरमधील वाढते अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्याची गरज असून, अन्यथा परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
