जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार विशेष वृत्तांत
तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संघटित वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. नदीपात्रात पाणी असल्याचा फायदा घेऊन ‘केणी’ आणि दोरखंडांच्या साहाय्याने वाळूची चोरी करणाऱ्या १५ मुख्य सूत्रधारांसह त्यांच्या साथीदारांवर गोंदी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे विशेषतः बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाण्याचा फायदा घेत ‘केणी’ तंत्राचा वापर गेल्या काही दिवसांपासून गेवराई (जि. बीड) तालुक्यातील वाळू तस्कर गोदावरी नदीपात्रात पाणी असल्याचा गैरफायदा घेत होते. प्रशासनाचे वाहन पोहोचू शकणार नाही, अशा ठिकाणी बीडच्या हद्दीतून नदीपात्रात लांबवर लोखंडी दोरखंड टाकले जात होते. या दोरखंडांना ‘केणी’ (वाळू उपसा करण्याचे साधन) बांधून अंबड तालुक्याच्या हद्दीतील वाळू खेचून नेली जात होती. यापूर्वी १८, १९ आणि २२ एप्रिल रोजी महसूल प्रशासनाने धाडी टाकून अनेक केण्यांचे दोरखंड कापून जाळून नष्ट केले होते.
