जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास, मेहरूण तलाव परिसरातील शांत वातावरण अचानक एका धक्कादायक घटनेने हादरले. तलावाच्या काठावर, नजरेस न पडणाऱ्या एका कोपऱ्यात, एक वयोवृद्ध बाबा पाण्यात निश्चल अवस्थेत तरंगताना दिसले… जणू आयुष्यानेच हार मानली होती.
ॲड. जमील देशपांडे आणि त्यांचे सहकारी दीपक धांडे झाडांना पाणी देत असताना दोन लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत धावत आली… “तलावात एक बाबा तरंगत आहेत!” एवढं ऐकताच दोघे ही तात्काळ घटनास्थळी धावले.
त्याठिकाणी जे दृश्य दिसलं, ते अंगावर काटा आणणारं होतं… पाण्यात उपडे पडलेले बाबा, कोणतीही हालचाल नाही… आजूबाजूला कोणीही नाही. दीपक यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उतरून त्यांना आवाज दिला. काही क्षणांनी त्यांच्या जीवंतपणाची हलकीशी चाहूल लागली. त्यांना सतत बोलत ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता, पण त्यांच्या मनातला राग आणि वेदना इतकी खोल होती की ते वाचवण्याच्या प्रयत्नालाच विरोध करत होते… दोन वेळा त्यांनी दीपक यांना दूर ढकलले.

त्यांच्या तुटक शब्दांतून समजत होतं घरगुती वाद, मनात साचलेला राग, आणि त्यातून घेतलेला हा टोकाचा निर्णय…
याच वेळी, त्या शांत काठावर एक छोटासा तपशील जीवदान ठरला. बाबांचा मोबाईल तिथेच ठेवलेला होता.
पाण्यात ते स्वतःला हरवून बसले होते, पण त्यांच्या अस्तित्वाची एक नाजूक दोरी अजूनही किनाऱ्याशी जोडलेली होती… तो मोबाईल. जणू शेवटच्या क्षणीही त्यांनी जगाशी नातं पूर्णपणे तोडलं नव्हतं.
त्या मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. एक कॉल केला… पुतण्याने फोन उचलला, जो संभाजीनगरला होता. त्याच्यामार्फत बाबांच्या मुलाला तात्काळ कळविण्यात आले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
केवळ २० मिनिटांत त्यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचला… आणि अखेर बाबांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
पण बाहेर आल्यानंतरही हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न त्यांच्या तोंडून उमटला “मला का वाचवलं..?”
तो प्रश्न फक्त त्यांच्या तोंडून नव्हता… तो प्रत्येक त्या वयोवृद्धाच्या मनातला आक्रोश होता, जो एकटेपणाने, दुर्लक्षाने आणि अपमानाने जखमी झाला आहे.
तोपर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी राहुल घेटे, विशाल चकोर आणि किरण पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या संयमी शब्दांनी, माणुसकीच्या स्पर्शाने, आणि समजुतीच्या आधाराने बाबांचा संताप हळूहळू शांत झाला… आणि त्यांना सुरक्षितपणे रिक्षातून घरी सोडण्यात आले.
आजचा दिवस एक मोठी शिकवण देऊन गेला. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्य संपवू शकतात…आणि वेळेवर मिळालेली माणुसकी आयुष्य परत देऊ शकते…
दीपक, बाबांचा मुलगा, आणि तातडीने धावून आलेले पोलीस बांधव यांच्या तत्परतेमुळे आज एक जीव वाचला.
घरात भांडण असू शकतं… पण ते इतकं वाढू देऊ नका की कोणाचं आयुष्यच संपवण्याची वेळ येईल. वयोवृद्ध लोकं ही जबाबदारी नाहीत… ते आपल्या आयुष्याचा पाया आहेत. त्यांना वेळ द्या, समजून घ्या, आणि सन्मानाने जपा.
असा एक मार्मिक संदेश या अनुषंगाने मनसे जिल्हाध्यक्ष श्री. जमील देशपांडे यांनी दिला.
