जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. :

जालना जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथील अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांचीही बदली चंद्रपूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. खून, दरोडे, लुटमार आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले. शहरासह ग्रामीण भागात गंभीर गुन्हे सर्रास घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती.

याशिवाय मटका, जुगार, देहविक्रय आणि ऑनलाइन जुगार यांसारख्या अवैध धंद्यांमध्येही वाढ झाल्याचे आरोप होत होते. या सर्वांवर प्रभावी नियंत्रण आणण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत होती. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर आळा बसला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परिणामी, जिल्ह्यात पोलिस प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे बदल महत्त्वाचे मानले जात असून, नव्या पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्था सुधारण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा

नवीन पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासमोर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे, अवैध धंद्यांवर आळा घालणे आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवणे ही मोठी आव्हाने असणार आहेत.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस आणि कडक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!