जळगांव – मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात “मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे होते. विद्यार्थ्यांसह अधीक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

युवराज पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मराठी भाषेचा उगम महाराष्ट्री प्राकृत भाषेतून झाला. भारतभर प्रचलित असलेल्या प्राकृत भाषांची लिपी ब्राम्ही होती. पुढे या लिपीचा विकास होत जाऊन देवनागरी लिपीचा उपयोग वाढला. यावेळी त्यांनी “गाथा सप्तशती” या राजा हाल यांनी संपादित केलेल्या प्राचीन ग्रंथाचा उल्लेख करत, त्यातून मराठी भाषेच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकला. तसेच “विवेकसिंधू,” “ज्ञानेश्वरी,” “लीळाचरित्र” यांसारख्या ग्रंथांचे दाखले देऊन मराठी भाषा समृद्ध कशी झाली, याचे विवेचन केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिच्या संवर्धनाला आणखी चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या भविष्यासंबंधी तसेच शासनाच्या भाषा धोरणाविषयी प्रश्न विचारले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी त्यांच्या शंका स्पष्ट करून मराठी भाषेच्या जतन आणि वृद्धीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धन सप्ताहामागील शासनाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली.

कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्री अरुण वाणी वरिष्ठ लिपिक,श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव, श्री बाळू बोरसे मुलांचे शासकीय वस्तीग्रह ते हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जितेंद्र धनगर तालुका समन्वयक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पाटील गृहपाल मुलींचे शासकीय वस्तीग्रह जळगाव यांनी केले. कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, गुणवंत मुलांचे शासकीय वस्तीग्रह जळगाव, तसेच मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीग्रह जळगाव येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती वैशाली पाटील, श्री एस आर पाटील, श्री बाळु बोरसे, श्री दीपक सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!