जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सुप्रीम कॉलनी

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून, याकडे जळगाव महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारे ठरत आहे. शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा होत असताना सुप्रीम कॉलनी परिसर मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव अत्यंत दुर्दैवी आहे.


विशेषतः पुढील मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे ..

१) सुप्रीम कॉलनी रिक्षा स्टॉप ते सागर अपार्टमेंट
२) सागर अपार्टमेंट (गीतांजली केमिकल) ते कृष्णानगर मागील परिसर सदर रस्त्यांवर सात ते आठ वर्षांपूर्वी केवळ खडी टाकून कच्च्या स्वरूपात काम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ना डांबरीकरण करण्यात आले, ना कोणतीही मजबुतीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. परिणामी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य अशी परिस्थिती निर्माण होत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे.

रस्ता, स्वच्छता आणि सुरक्षित प्रवास या कोणत्याही प्रशासनाकडून नागरिकांना मिळणे अपेक्षित असलेल्या मूलभूत सुविधा आहेत. सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मग महानगरपालिकेला नियमित कर भरणाऱ्या नागरिकांनी मूलभूत सुविधा मागायच्या नाहीत का? कर भरायचा नागरिकांनी आणि बदल्यात खड्डे, धूळ आणि त्रास सहन करायचा, हीच का शहर विकासाची व्याख्या? असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

या भागात औद्योगिक वसाहतीत काम करणारा नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अनेकांना महानगरपालिकेपर्यंत तक्रार पोहोचविणे शक्य होत नाही. याच कारणामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला आहे. नागरिकांच्या या व्यथा लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे.


एकीकडे शहर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना शहरापासून काही अंतरावर असलेल्या या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष होणे हे निश्चितच खेदजनक आहे. विकास हा केवळ मध्यवर्ती भागापुरता मर्यादित न राहता शहराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.

तरी सदर प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन सुप्रीम कॉलनी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व आवश्यक विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत, तसेच नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ही नम्र परंतु ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासन या संदर्भात लोकहिताचा सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष – श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष – ललित शर्मा, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भील, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, राजेश मराठे, बादशहा शहा, यांच्या सोबत इतरही महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!