जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
टेंभुर्णी / जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या दाट क्षेत्रात बिबट्याने आपला तळ ठोकल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले असून, वनविभागाकडे वारंवार दाद मागूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन; हल्ल्याचा प्रयत्न
कुंभारझरी शिवारात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना दिवस-रात्र शेतात थांबावे लागते. याच दरम्यान अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे पाऊलखुणे (पगमार्क) आढळून आले आहेत.

शिवाजी महाराज चव्हाण हे शेतकरी आपल्या शेतातील उसाला पाणी भरत असताना अचानक बिबट्या त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकला. या अनपेक्षित प्रसंगामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली.
दुसऱ्या एका घटनेत, ज्ञानेश्वर चव्हाण यांनाही बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. बिबट्याने त्यांच्या दिशेने धाव घेताच, त्यांनी प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
याशिवाय शेतकरी रामेश्वर चव्हाण, संतोष माळी यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला पाहिले असल्याचे सांगितले आहे. शिवारात काही ठिकाणी कुत्र्यांची शिकार झाल्याचेही उघडकीस आले आहे.
जीव धोक्यात घालून शेतीकामांची लगबग
सध्या उसाचा हंगाम आणि पिकांना पाणी देण्याची वेळ असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अनिवार्य आहे. मात्र, परिसरात बिबट्याचे सावट असल्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्या कुठे दबा धरून बसला असेल याचा नेम नाही, अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन आम्हाला शेतात काम करावे लागत आहे, अशी आर्त हाक स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
वनविभागाची सुस्त भूमिका; गावकऱ्यांमध्ये संताप
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे आणि शिकारीच्या घटनांमुळे गावकऱ्यांनी वनविभागाला अनेकवेळा याबाबतची माहिती दिली आहे.
मात्र, वनविभागाने या संवेदनशील गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे एखादी मोठी जीवितहानी होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल आता कुंभारझरीवासीय विचारत आहेत.
गावकऱ्यांची प्रमुख मागणीः
शिवारात बिबट्याची दहशत प्रचंड वाढली आहे. कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
