विशेष प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.
अमरावती शहरात एक खळबळजनक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. वलगाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (PSI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची अतिशय निघृण हत्या करण्यात आली. ही घटना अमरावतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
पोलीस खाते हादरलं ! कार अंगावर घालून PSI ची निघृण हत्या, पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत होतेच कशी? प्रशासनाची पकड गुन्हेगारांवर राहिली नाही का? जिथे पोलीसच सुरक्षित नाही, तिथे सर्व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? हा मोठा प्रश्न सर्व सामान्य जनता आता विचारू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे आपल्या दुचाकी वरून जात असताना त्यांना एका फोर व्हिलरने उडवलं. अपघात झाल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्याच क्षणी सुमारे पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. पोटावर आणि छातीवर एका मागोमाग एक वार करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्या नंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी अवस्थेत कलाम यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन आणि आवेज खान अयुब खान या तिघांना अटक केली आहे. मात्र, या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या हत्येचा सर्व अंगाने तपास सुरू आहे. या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न समोर आला आहे – जर एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या रस्त्यात उघड्या डोळ्यांनी होऊ शकते, तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? शहरात सुरक्षेचं काय? या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. सध्या अमरावती पोलीस या हत्येच्या सर्व शक्य कोनांमधून चौकशी करत असून हल्लेखोरांच्या पार्श्वभूमीचा तपासही सुरू आहे. पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेवर घाव घालणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अमरावतीकडे वळले आहे.
